मुलीच्या वाढदिवसानिमित्त कवी रवि सोनार यांचा अनोखा उपक्रम

मुलीच्या वाढदिवसानिमित्त कवी रवि सोनार यांचा अनोखा उपक्रम




पंढरपूर Live 20 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) :- एकविसाव्या शतकात अवती भोवतीच्या नानाविध भौतिक सुखवस्तुंमुळे मानवी जीवनात भोगवादाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने लहान मोठे सण व उत्सव फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी फलक, हारतुरे, विद्युत रोषणाई व गाण्यांच्या आवाजात मोठ्या डामडौलात साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. हल्लीच्या काळात वाढदिवस सुद्धा याला अपवाद नाही. 

          परंतु येथील अष्टपैलू साहित्यिक व विश्वविक्रमी कवी रवि वसंत सोनार यांनी त्यांची कन्या कुमारी रेवती सोनार हिच्या वाढदिवसाच्या औचित्याने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन एक अनोखा उपक्रम राबविला आहे. कवी रवि सोनार यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्री सौ. पुष्पावती वसंत सोनार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येक वर्षी त्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहास पुष्पाई काव्य पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. 

         या पुष्पाई काव्य पुरस्कारासाठी त्यांनी येथील पंढरपूर पत्रलेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. अशोक कोर्टिकर,विद्यमान अध्यक्ष मा. धनंजय नाईकनवरे, मा. राजुभाई मुलाणी यांच्याकडे एकरकमी ठेव ठेवली आहे. या ठेवीच्या प्रतिवर्षी येणार्‍या व्याजातून प्रत्येक वर्षी एका मराठी कवयित्रीला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

      मुलीच्या वाढदिवसानिमित्त आईच्या स्मरणार्थ मराठी कवयित्रींसाठीच्या या पुरस्कार योजनेमुळे स्त्री सन्मान होणार असल्यामुळे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल, अंकुश गाजरे, कवी राजेंद्र झुंबर भोसले, कादंबरीकार दादासाहेब खरात, गझलकार सचिन कुलकर्णी, कवी सूर्याजी भोसले, गणेश गायकवाड, उमेश सासवडकर, अमर कांबळे, संग्राम जाधव, किरण घोडके, स्तंभलेखक स्वप्नील कुलकर्णी, कथाकार सुजितकुमार कांबळे, कवयित्री सौ. शोभाताई माळवे, सौ. संगीताताई मासाळ, सौ योगीणीताई ताठे निषाद प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ. मनीषाताई कुलकर्णी, तसेच महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी, पत्रकार आणि रसिक यांचेकडून कवी रवि सोनार यांच्या उपक्रमाचे कौतुक व आनंद व्यक्त केला जात आहे.

Comments